संपादकीय
मंडळी, जालरंग प्रकाशनाचा पहिला-वहीला दिवाळी अंक दीपज्योती आपल्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा अंक तयार करण्यासाठी ज्या लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साहाय्य झालंय त्यांचे नावानिशी अभिनंदन करावे म्हणून हा लेखन प्रपंच.
ह्या अंकाची मांडणी,सजावट इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी अतिशय सहजतेने सांभाळलेत ते कांचन कराई हिने...त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन .
वेळोवेळी बारकाईने पाहणी करत ह्या अंकाच्या जडण-घडणीकडे लक्ष देऊन त्यातल्या बारीक-सारीक चुका दुरुस्त करण्याचं काम केलंय श्रेया रत्नपारखी हिने. ह्या अंकाचे संपादकीय देखिल श्रेयानेच लिहिलंय....त्याबद्दल तिचेही अभिनंदन.
ह्या अंकासाठी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ चेतन गुगळे ह्याने बनवलंय...त्याबद्दल त्याचेही अभिनंदन.मुखपृष्ठामागची संकल्पना अशी आहे की....
चित्रात मध्यवर्ती स्थानी काळाचा अनादी अनंत प्रवास प्रतिकात्मक रूपात दाखविण्यात आला असून त्याच्या सभोवताली तारे आणि दीपावलीच्या तेजाने प्रकाशमान झालेली पृथ्वी दाखविण्यात आली आहे. या शिवाय उरलेल्या भागात अंधाराच्या चिरंतन साम्राज्याचे प्रतिनिधित्व काळ्या रंगाने केले आहे.
जिथे काळाच्या प्रवासाचा किंचितसा तुकडा पडून अंतर जाणवत आहे तो आपल्या या वर्षीच्या दिवाळीचा काळ आहे आणि ती आपल्या सर्वांकरिता आनंद घेऊन येणारी असल्याने आपली 'वक्तसे कहना जरा वह ठहर जाएं यही' अशी होणारी अवस्था दाखविण्यात आलीय.
ह्या अंकाच्या संपादनात मदत केल्याबद्दल सचिन उथळे-पाटील ह्याचेही अभिनंदन!
ह्या अंकासाठी आलेले लेखन तपासण्यासाठी आम्हाला मनोगत ह्या संकेतस्थळाचा शुद्धिचिकित्सक आणि श्री. शंतनू ओक ह्यांनी अग्नीकोल्ह्याला जोडलेला शुद्धिचिकित्सक ह्या दोहोंचे मोलाचे साहाय्य लाभले...त्याबद्दल आम्ही दोन्ही संबंधितांचे जाहीर आभार मानतो.
आणि शेवटी... ह्या अंकासाठी साहित्य पाठवणार्या समस्त लेखकुमंडळींचेंही आभार आणि अभिनंदन! कारण त्यांच्याविना हा अंकच अस्तित्वात आला नसता.
आता हा अंक आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या हाती सुपूर्त करत आहोत...आपणच काय ते ठरवा ..चांगला की वाईट.
धन्यवाद!
कळावे,
आपला स्नेहांकित,
प्रमोद देव
मनोगत
जालरंग प्रकाशनातर्फे हा पहिला दिवाळी अंक वाचकांच्या स्वाधीन करताना विशेष आनंद होतो आहे. जालरंगने यापूर्वी २००९ साली हिवाळी अंक शब्दगाऽऽरवा , २०१० साली होळी विशेषांक हास्यगाऽऽरवा, पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा आणि १५ ऑगस्टच्या निमित्ताने जालवाणी असे चार अंक प्रकाशित केलेले आहेत. हा प्रत्येक अंक एका ब्लॉगच्या माध्यमातला होता तरी काही विशिष्ट वेगळेपणा जपण्याचा आम्ही प्रयत्न केला होता.
शब्दगाऽऽरवा हा केवळ एक साध्या ब्लॉगसारखा होता आणि आमचा पहिलाच प्रयत्न होता.त्यानंतर निघालेल्या हास्यगाऽऽरवा करता आम्ही इ-पुस्तकाचे माध्यम वापरायचे ठरवले. पुस्तक स्वरूपात निघालेला अंक होता सुरेख, संगणकावर उतरवून घेऊन स्वत:च्या सोयीने वाचण्यासारखा; पण यांत एक अडचण अशी होती की एखाद्या विशिष्ट लेखाबद्दल प्रतिक्रिया देण्याची सोय त्यात नव्हती. दिलेली प्रतिक्रिया संपूर्ण पुस्तकाकरता लागू व्हायला लागली शिवाय प्रतिक्रिया देण्याकरता सुद्धा ते इ-पुस्तक ज्या संकेतस्थळाच्या मदतीने तयार केले होते तिथे नाव नोंदवावे लागायचे. ब्लॉगच्या रोजच्या लेखावर साधी सुटसुटीत प्रतिक्रिया देण्याचा पर्याय उपलब्ध असताना सुद्धा जिथे भल्या बुर्या प्रतिक्रिया मिळताना मारामार तिथे मुद्दाम नाव नोंदणी करून प्रतिक्रिया कोण देणार ! त्यामुळे ऋतू हिरवा प्रकाशित करताना पुन्हा पूर्णपणे ब्लॉगचा आधार घेतला पण त्याचवेळी अंकाचे दृष्यस्वरूप थोडे आकर्षक करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आलेला जालवाणी तर मराठी इ-अंकांच्या यादीत ऐतिहासिक ठरावा कारण हा संपूर्ण अंक अभिवाचनाच्या माध्यमातून साकारला गेला होता. याच तर्हेने ब्लॉगच्या माध्यमातून पण केवळ लिखित स्वरूपावर अवलंबून न राहता कालानुरूप दृक-श्राव्य(ऑडियो-व्हिडियो) माध्यमांशी देखील हातमिळवणी करून प्रकाशित होत असलेला हा दिवाळी अंक तर जालरंग प्रकाशनाच्या आजपावेतो निघालेल्या अंकांचा जणू परिपाक असेल.
हे विशेषांक ब्लॉगस्वरूपात प्रकाशित करण्याचे मुख्य कारण म्हणजे; पारंपारिक अंकातील एखादं साहित्य आपल्याला आवडलं तरी त्यावर तत्काळ तिथल्या तिथे प्रतिक्रिया देण्याची काही सोय उपलब्ध नसते. इ-अंकांमध्ये मात्र लेखक,प्रकाशक,वाचक हा दुवा सांधला गेलेला आहे.
पारंपारिक काय किंवा इ-अंकात काय… आलेले सगळे साहित्य स्वीकारले जातेच असे नाही. पाठवणारी व्यक्ती प्रथितयश लेखक / लेखिका असल्याशिवाय हे भाग्य वाट्याला येत नाही. आणि अगदी नवोदितांना संधी मिळाली तरी तो अंकही त्यांच्याप्रमाणेच नवीन असल्याशिवाय ती शक्यता नाही. पण जालरंग ने मात्र सुरुवातीपासूनच कोणतेही साहित्य नाकारायचे नाही हा शिरस्ता स्वत:ला घालून घेऊन अंकजगतात एक नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळेच की काय; पहिल्या अंकाला जेमतेम २०-२२ साहित्यसंख्या असणार्या आणि त्यातही पन्नास टक्के पद्य साहित्य असणार्या जालरंगने, या दिवाळी अंकाच्या निमित्ताने ३५ च्या वर साहित्यसंख्या पार केलेली आहे. बहुतेक लेखक / लेखिकांचे स्वत:चे ब्लॉग्ज असूनही… स्वत:च स्वत:चे साहित्य प्रकाशित न करता ते जालरंग च्या वाचकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करू इच्छितात ह्यातच जालरंगच्या यशाची पावती आहे. नवोदितांबरोबरच अगदी वाट्टेल त्या विषयाला हात घालणार्या प्रथितयश लेखकांचाही यात समावेश आहे.
बरेचसे वाचक स्वत:ही काहीबाही लिहीत असतात, स्वत:च्या ब्लॉगवर प्रकाशित करत असतात. स्वत:च्या एखाद्या लेखावर मिळणार्या प्रतिक्रिया आपल्याला किती बळ देऊन जातात हे माहिती असूनही इतरांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देण्यात मात्र हीच मंडळी उदासीन असतात. तेव्हा मंडळी ह्या अंकाचा आनंद लुटायला तयार व्हा आणि हो आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मात्र !
आपणास आणि आपल्या कुटुंबीयांस ही दिवाळी सुखाची, समाधानाची, समृद्धीची आणि आरोग्याची जावो हि सदिच्छा !
श्रेया रत्नपारखी
20 प्रतिक्रिया:
दिवाळी अंक मस्त झालाय.
यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे हार्दिक आभार.
सर्व मान्यवर लेखक/लेखिकांचे हार्दिक आभार.
अभिनंदन संपादक मंडळ!
अंक खरंच जबरी झालाय. अंक वाचत वाचत म्हणजे त्याची चव चाखत चाखत दिवाळी साजरी करायची. ह्यावेळी हार्ड कॉपी असलेल्या नेहमीच्याच प्रसिद्ध दिवाळी अंकांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात ब्लॉगर्सचा हा ऑनलाईन दिवाळी अंक म्हणजे खरंच पर्वणीच आहे. :-)
खूप खूप अभिनंदन :)
वाचून प्रतिक्रिया कळवेनच.
अभिनंदन...! अंक देखणा झाला आहे.
वाचून प्रतिक्रिया कळवतोच. लेखकांचे आणि अंकावर मेहनत घेणा-या सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन...!
दिवाळी अंक मस्तच जमलाय यात तिळमात्रही शंका नाही, यासाठी मेहनत घेतलेल्या प्रत्येक माणसाचे अभिनंदन करावेसे वाटते मग ते अगदी तांत्रिक बाबी सांभाळणारे असो किंवा मग लेख लिहिणारे.
अंकाला असाच उदंड प्रतिसाद लाभेल हिच सदिच्छा जालरंग प्रकाशनातील माझ्या समस्त मित्र परिवाराला आणि दीपज्योतीच्या तमाम वाचकांना दिवाळिच्या मन:पूर्वक शुभेच्छा... ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची, आनंदी, आरोग्यदायी आणि यशोन्नतीकडॆ घेऊन जाणारी जावो हिच सदिच्छा.....
दिवाळी अंकाचा तोंडवळा खूपच रंगारंग सुंदर जमलाय. खास्करून रंगसंगतीचा विचार खूपच छान केला गेलाय. लेख वाचताना अगदी एखादा handmade paper नं बनलेलं exotic पान वाचावं तसा भास होतो. हळू हळू सारा अंक वाचून काढेनच.
नमस्कार.. मी आज प्रथमच comment लिहित आहे. आत्तापर्यंत अनुजा कडून तुम्हा सर्वांबद्दल खूप ऐकले आहे. आज तुमचा दिवाळी अंक बघून खूपच समाधान वाटले. दिवाळी अंकाची मांडणी आणि त्यातील अनेक लेख वाचनीय आहेत. तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळी करिता हार्दिक शुभेच्छा. आज अनुजा मुंबईतच आहे.
धनंजय पडसलगीकर -Muscat
dhan210@yahoo.com
Good going, E Deevali Ank.. sankalpanach khoop chhan ahe.. hava tevha hava tithun access karta yeta.. anek shubheccha!
निव्वळ अप्रतिम..खूप खूप अभिनंदन
मनोगत मनापासून आवडलं. अंकाची सजावट आणि मुखपृष्ठ देखिल उत्तम आणि आकर्षक झालं आहे. हार्दिक अभिनंदन!
देवा, अंक तर सुंदरच सजलेला दिसतो आहे! त्याकरता हार्दिक अभिनंदन! मात्र, ती प्रवेशाची पायरी तेवढी काढून टाकावी असे वाटते आहे.
देवकाका,खुप छान झाला आहे अंक...तुम्हा सगळ्या संपादक मंडळाची अन सहभागी मंडळाची मेहनत दिसुन येत आहे...अभिनंदन...!!!
क्रांति जी, मुखपृष्ठ उत्तम आणि आकर्षक झालं असल्याचं आवर्जून नमूद केल्याबद्दल आपले आभार.
अंक आपल्या सगळ्यांना आवडला हे ऐकून खूप बरं वाटलं...हा अंक तयार करण्यासाठी मेहेनत करणार्या सगळ्यांच्या श्रमाचं सार्थक झालं असं मी मानतो. त्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो.
काका हे मात्र तुम्ही अपूर्णच लिहीलंत बरं का...
"ह्या अंकासाठी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ चेतन गुगळे ह्याने बनवलंय...त्याबद्दल त्याचेही अभिनंदन."
पूर्ण सत्य असं आहे की या मुखपृष्ठावरची शीर्षकपट्टी मी बनविलेली नाहीय ती काकांनीच मला इ-पत्राद्वारे पाठविली होती त्यामुळे त्याचं श्रेय मी घेऊ शकत नाही.
धन्यवाद.
ती शीर्षकपट्टी सगळीकडेच आहे..तेव्हा लोक काय ते समजतील..तू काळजी करू नकोस. :)
ती कांचनची कमाल आहे...आणि त्यातले ओळखचिन्ह ही विशालची कमाल आहे...एकूण ही सगळी तुम्हा लोकांची कमाल आहे.
खुपच छान ! झक्कास !
!!अभिनंदन !!
काका, अभिनंदन हा शब्द फारच तोकडा आहे. प्रत्येक अंकात काहीतरी नविन देण्याच्या तुमच्या चिकाटीला सलाम !!
~ वाहीदा
ANK AHE HE AAJ SAMAJALE ATA ANK VACHUN NANTAR PRATIKRIYA DEIN
टिप्पणी पोस्ट करा